रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीच्या सर्वेक्षणाची मागणी; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
आरवली :
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये घराखालील जागा अद्यापही प्रत्यक्ष घरमालकांच्या नावावर नसल्याने सध्याच्या आणि पुढील पिढ्याना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवून ग्रामपंचायत हद्दीतील घराखालील जमीन मूळ घरमालकांच्या नावाने करण्यात यावी, अशी ठाम मागणी जिल्हा परिषद सदस्य सुशील बबन भायदे यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची गंभीर दखल घेत ना. बावनकुळे यांनी अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना या निवेदनाची नियमानुसार तात्काळ तपासणी करून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
कुळ कायद्याप्रमाणे शेतजमीन मिळाली, मात्र घराखालील जमीन अद्याप अनिश्चित
महसूलमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सुशील भायदे यांनी म्हटले आहे की, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात कुळ कायद्याप्रमाणे अनेक परंपरागत कुळांना त्यांच्या शेतजमिनीचा कायदेशीर हक्क मिळाला. परंतु ज्या जमिनीवर ज्यांची घरे उभारलेली आहेत, त्या घरांच्या खाली असणारी जमीन अनेक गावांमध्ये आजही घरमालकांच्या नावावर झालेली नाही. त्यामुळे सध्याच्या पिढीसोबतच येणाऱ्या पुढच्या पिढीलाही हा अत्यंत त्रासदायक आणि गुंतागुंतीचा प्रश्न भेडसावणार आहे.
नव्याने सर्वेक्षण करून नावे लावण्याची मागणी
भायदे यांनी निवेदनात पुढे मागणी केली आहे की, रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व घराखालील जमिनींचे पुन्हा एकदा नव्याने आणि अचूक सर्वेक्षण करण्यात यावे. त्यानंतर सदर जमीन संबंधित घरमालकांच्या नावाने करण्याबाबत महसूल विभागाला स्पष्ट आदेश द्यावेत. हे निवेदन रत्नागिरी येथे महसूलमंत्री बावनकुळे यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.
कर्ज, वारस नोंद आणि योजनांच्या लाभासाठी अडचण
घराखालील जमीन स्वतःच्या नावावर नसल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना बँकेचे गृहकर्ज मिळवणे, वारस नोंदणी करणे, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे यामध्ये मोठ्या प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या दीर्घकालीन प्रलंबित विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडूनही सातत्याने होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 03-08-2026














