विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हेगारीविषयी जागृती; ओटीपी फसवणूक आणि फिशिंगवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Cyber Security Campaign च्या माध्यमातून रत्नागिरीतील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित डिजिटल वापराबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सायबर वॉरियर क्लब आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथील रा. भा. शिर्के प्रशालेत “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या विशेष अभियानांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक के. डी. कांबळे व उपमुख्याध्यापिका सौ. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान देणे आणि त्यांना जबाबदार तसेच सजग डिजिटल नागरिक बनवणे हा होता. शालेय वयातच इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा वापर वाढल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांची सवय लावण्यावर या मोहिमेत भर देण्यात आला.
कार्यक्रमात “सायबर सुरक्षा” या विषयावर अत्यंत माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले. यामध्ये सध्याच्या काळात वाढणारे ओटीपी फ्रॉड, फिशिंग अटॅक, सोशल मीडिया फसवणूक, ऑनलाइन गेमिंग फ्रॉड, बनावट (फेक) लिंक, क्यूआर कोड फसवणूक, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहार यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. सादरीकरणानंतर झालेल्या संवादात्मक सत्रात आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या मोहिमेत सायबर वॉरियर क्लबचे सदस्य स्नेहा भिडे, आर्या मोहित, राज गुरव, आयुष सनगरे, निरुपम मल्लिक, नैपुण्या खानविलकर, श्रवण बोथले, सृष्टी पाटील, गंधार चव्हाण आणि ऋग्वेद फडके यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, मजबूत पासवर्डची निर्मिती, ओटीपी व वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याविषयी अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत सायबर सुरक्षेची शपथ घेतली. डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने, सुरक्षितपणे आणि सजगतेने वापर करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी केली. “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” ही मोहीम एका सुरक्षित आणि सक्षम डिजिटल भारताच्या उभारणीसाठी अत्यंत मोलाचे पाऊल ठरत असून विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:51 03-08-2026














