चिपळूण : तालुक्यातील अनेक गावातील पाणी योजना पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. परिणामी यावर्षी पाणी टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात सुमारे ५४ गावांतील वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाची दाहकता वाढण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप एकाही गावाने टँकर सुरू करण्याची मागणी केलेली नाही.
येथील पंचायत समितीच्या वतीने दरवर्षी पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. आ. शेखर निकम यांनी नुकतीच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेत टंचाईची माहिती घेतली होती. ज्या गावात संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते अशा गावांना प्रस्ताव करण्याची सूचना केली होती. त्यानुसार तालुक्यातील नारदखेरकी, अढरे, अडरे मांडवखरी, कळकवणे दादर, कोसबी, टेरव, तळसर, ओमळी, कुटरे, नांदिवसे, मिरजोळी, सावर्डे, बीर, गांग्रई, करंबवणे, पाचाड, कोंडमळा आदी गावांनी पाणी टंचाईसाठीचे प्रस्ताव दिले आहेत. तालुक्यातील ११ गावातील २९ वाड्यांनी नवीन विंधन विहिरीची मागणी केली आहे तर ३ वाड्यांनी विंधन विहीर दुरुस्तीची मागणी केली आहे. त्याचबरोबर १६ गावातील २४ वाड्यांमध्ये नळपाणी योजना दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ८ गावातील ९ बाड्यांनी विहिरीतील गाळ काढण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८२ हजारांचा खर्च प्रस्तावित आहे.
यावर्षी खासगी विहिरी अधिग्रहण करणे प्रस्तावीत केलेले नाही. मात्र, पाणी टंचाईची दाहकता अचानक वाढल्यास प्रशासनाकडून खासगी विहिरी अधिग्रहीत होऊ शकतात. दसपटीतील तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याची दुरूस्ती झालेली नाही. या धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला. मात्र, अद्याप भरणाची उभारणी न झाल्याने दसपटीतील गावांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कळवंडे धरण दुरुस्तीचे काम सुरू असल्याने धरणात पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे धरणाखालील गावांना देखील टंचाईची झळ बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी टैंकरची मागणी प्रस्तावीत केली आहे.
अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतरच टँकर धावणार…
तालुक्यातील अनेक गावांनी टँकरची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी झाल्यानंतरच मागणी आलेल्या गावात टँकर सुरू केले जाणार आहेत. यावर्षीच्या पाणी टंचाई आराखडयास जिल्हाधिका-यांची मान्यता मिळाल्यानंतरच निधी उपलब्धतेनुसार टंचाईची कामे केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 19/Feb/2025














