वेळास किनाऱ्यावरून समुद्रात झेपावली ऑलिव्ह रिडले कासवांची ५० पिल्ले

मंडणगड : मागील दोन वर्षांपासून बदललेल्या वातावरणामुळे कासवांचे गाव म्हणून ओळख तयार झालेल्या वेळास किनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या उमटलेल्या पाऊलखुणा पाहायला दोन महिन्यांचा विलंब झाला. किनाऱ्यावरील हॅचेरीमध्ये ३२ घरट्यांतून ३ हजार ५७९ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यातून आतापर्यंत ५० पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. लवकरच कासव महोत्सव घोषित होण्याची शक्यता आहे.

ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संरक्षण मोहिमेमुळे वेळास हे गाव गेल्या १६ वर्षांपासून जगाच्या नकाशावर आहे. त्यामुळे गावात पर्यटन उद्योग विकसित झाला आहे. कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी स्थानिक तसेच राज्यासह देशातील पर्यटक व अभ्यासक या गावास भेट देत असतात. यंदाचा कासव विणीचा हंगाम वातावरणातील बदलामुळे विविध कारणांनी लांबणीवर गेला. २०२१ पर्यंत अंडी सापडण्यास हंगामास सप्टेंबर महिन्यात सुरुवात होत होती.

घरट्यात अंडी संरक्षित केल्यावर साधारपणे ९० दिवसांनी या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडतात व समुद्रात निघून जातात. २०२२ च्या हंगामात १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील पहिले घरटे वेळास किनारी सापडले होते. २०२३ मध्ये मात्र तब्बल दोन महिने उलटून गेले तरी हंगामास सुरुवात झाली नव्हती. तीच परिस्थिती यावषींही आहे. गतवर्षी ४ जानेवारीला पहिले घरटे आढळून आले होते. मागील काही वर्षांत अंडी लवकर सापडल्याने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतही कासवांचा जन्मसोहळा पाहण्याची संधी कासवप्रेमींना मिळाली होती; मात्र दोन वर्षांपासून हा महोत्सव मार्च, एप्रिलमध्ये करावा लागत आहे.

जगभरात आढळणाऱ्या कासवांच्या सातपैकी पाच प्रजाती भारतात आढळतात. पश्चिम किनारपट्टीचा विचार केल्यास गुजरात व महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यांवर सागरी कासव अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. त्यापैकी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या माद्या कोकण किनारप‌ट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात.

राखीव क्षेत्र बनविण्याचा प्रस्ताव रखडला
भारतातील पहिले प्रस्तावित राखीव क्षेत्र घोषित करण्यासाठी वेळास येथील समुद्रकिनारी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी गतवर्षी डिसेंबर महिन्यात पाहणी दौरा केला होता. समुद्री कासव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून वेळास किनारा घोषित करण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चाही झालेली होती; मात्र तो प्रस्ताव लांबलेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 19/Feb/2025