मंडणगड : शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराला कृषी विभागाचे बळ

मंडणगड : तालुक्यातील रब्बी क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने केलेला प्रयत्न, भाजीपाला कीटचे वाटप आणि दिलेले प्रोत्साहन यामुळे शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगाराला कृषी विभागाचे बळ मिळाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेती, पर्यटन आधारे आर्थिक विकासाची वाट तालुक्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहे.

कर्मसिद्धांत डोळ्यासमोर ठेवून भाजीपाला, शेतीपूरक उद्योग, पर्यटन यातून शेतकरी आपले पाय रोवू पाहत आहेत. कृषी विभागामार्फत वाल, चवळी, कुळीथ, मूग, मसूर, भुईमूग या भाजीपाला लागवड कीट १०० हेक्टरसाठी वाटप करण्यात आले. तसेच स्थानिक वाणअंतर्गत वाल व पावटा यांचाही सामवेश आहे. २०२३-२४ मध्ये २७० हेक्टर लागवड करणारा तालुका २०२४-२५ वर्षात ६० हेक्टरने वाढ करून ३३१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. यामध्ये पिंपळगाव, कोंझर, तिडे, टाकेडे, पिंपलोळी, कादवण, आंबवली, उमरोली या परिसरातील गावांचा समावेश आहे. पीएम किसानअंतर्गत ५८१० शेतकऱ्यांना अठरावा हप्ता वितरित करण्यात आला आहे. तसेच असुरक्षित आदिवासी समूहांतर्गत १७४ लाभार्थीना मंजुरी देण्यात आली आहे.

शेतीआधारित उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभे राहण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर अनेक प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत. त्यात आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद या कोकणी फळांवर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक पुढाकार घेत आहेत. शेतीपर्यटन व सेवा उद्योगाच्या माध्यमातून नदी किनाऱ्यावरील गावे, धरण परिसर, खोऱ्यातून, खलाटी शेतात कृषी पर्यटन बहरू शकते. या संदर्भातील वाटचाल अधिक प्रशस्त करण्यासाठी रोडमॅप मात्र तयार करणे गरजेचे आहे. पर्यटन विकासाचे अनेक आयाम तालुक्यास लाभले आहेत. एकंदरीत पर्यावरणस्नेही सम्यक विकासाच्या आधारे तालुक्यात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे कीट वाटप करण्यात आले. चालू वर्षात रब्बी क्षेत्राची वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. लाभमिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. – सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी

दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन फायदेशीर
डेअरी फार्मिंगकडे येथील तरुण रोजगाराचे साधन म्हणून पाहू लागला आहे. दुधाच्या नैमित्तिक वापरासाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असणाऱ्या मंडणगड तालुक्यात मोठ्या दूध उत्पादन कंपन्यांनी आपली संकलन केंद्रे सुरू केल्याने दुग्ध उत्पादनाला वाव मिळाला आहे. त्याला कुक्कुटपालन व शेळीपालनाची तितकीच समर्थ साथ मिळू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 19/Feb/2025