चिपळूण : कोळसा भट्ट्या लावलेल्या जागामालकांचा शोध सुरूच

चिपळूण : तालुक्यातील कळवंडे येथे वनविभागाने कोळसा भट्टया उद्‌ध्वस्त केल्या असल्या, तरी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणी जागामालक आणि संबंधितांचा शोध घेतला जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

वनविभागाकडून कोळसा भट्टीला परवानगी दिली जात नाही. तसेच न्यायालयानेही कोळसा भट्टीवर बंदी घातली आहे. तरीही गेल्या काही वर्षांत टेरव येथे कोळसा भट्टचा धगधगत असल्याचे उघड झाले होते. टेरवमधील कोळसा भट्टी व्यावसायिकांवर अनेकदा कारवाईदेखील झाली; मात्र तरीही यावर्षी कोळसा भट्टया सुरूच राहिल्या होत्या. यावरून टेरव ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रार केली होती. कोळसा भट्टी बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर वनविभागाने टेरव येथे धाडी टाकून कारवाई केल्या, संबंधितांवर गुन्हेदेखील दाखल केले. टेरव येथील कोळसा भट्टीचा सिलसिला बंद झाल्यानंतर कळवंडे येथे त्या धगधगत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.

कळवंडे माडवाडीत एकूण १२ भट्टया वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्‌ध्‌वस्त केल्या. माडवाडीतील डोंगरावर या भट्टया लावल्याचे उघड झाले होते; मात्र अद्याप या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. भट्टचा कोणाच्या जागेत लावण्यात आल्या, लाकूडसाठा कोठून करण्यात आला, वृक्षतोडोला वनविभागाची मान्यता होती का, आदी विविध बाबींची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 20/Feb/2025