मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी

मालवण : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतिक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे उभारण्यात येणारा पुतळा जगाला हेवा वाटेल, असा भव्य दिव्य असणार आणि जगभरातून लोक या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतील, असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा ‘पायाभरणी समारंभ’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे बुधवारी झाला. यावेळी आमदार दीपक केसरकर , आमदार नीलेश राणे, आमदार कालीदास कोळंबकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आदी उपस्थित होते. यावेळी कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे बारकाईने लक्ष

पालकमंत्री पुढे म्हणाले, पुतळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून ते हा पुतळा कसा बनावा, त्याची डिझाइन कशी असावी, पुतळा कोणी बनवला पाहिजे, त्याची तांत्रिक बाबी काय असल्या पाहिजेत याबाबत अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत. यासाठी अनेक बैठका मंत्रालयस्तरावर घेण्यात आल्या आहेत.

शिवसृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न हवे : दीपक केसरकर

आमदार दीपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक उपक्रम राबवित आहे. नाविक दलाची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची दखल घेऊन नौदलाच्या झेंड्यामध्ये राजमुद्रेचा समावेश करण्यात आला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या जिल्ह्यात शिवसृष्टी उभारण्यासाठी देखील प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पुतळा सुरक्षेसाठी उपाययोजना आवश्यक : नीलेश राणे

आमदार निलेश राणे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढीला देखील कळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराजांचा पुतळा उभारताना परिसरातील सुरक्षेसाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. या परिसरात पेालिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 20-02-2025