चिपळूण : शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. या उड्डाणपुलावर एका बाजूने गर्डर चढविण्याचे काम कालपासून सुरू झाले. दोन महाकाय क्रेनच्या साह्याने हे काम केले जात आहे पिलरवर कॅप उभारणीसह गर्डर चढवण्याची कामे गतीने सुरू राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. कुलकर्णी यांनी दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती येऊ लागली आहे. पिअर तोडल्यानंतर आत्ता नवीन पिअर कॅप उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तीन टीम काम करत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्ये बदल सुचविले होते. यामध्ये सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले होते. त्यामधील अंतर कमी करून ते २० मीटरवर ठेवले आहेत. आता नवीन रचनेनुसार, या पुलाचे काम सुरू केले आहे. यामध्ये पिअरकॅप उभारण्याचे काम वेगाने सुरू झाले असून, एकूण ९५ पैकी १३ पिअरकॅपचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. त्यानंतर आता पिअरकॅप उभारण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आल्या आहेत. बुधवारी या कामाची चाचणी घेण्यात आली. गुरुवारी पुलाच्या एका बाजूने गर्डर चढविण्याचे काम सुरू केले आहे.
दीड वर्षापूर्वी भाग कोसळला
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर तर रुंदी ४५ मीटर इतकी आहे. १६ ऑक्टोबर २०२३ ला या पुलाचा काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्यानंतर त्यावर मंथन सुरू झाले. केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 21/Feb/2025
