रायगड : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. महामार्गावरील प्रत्यक्ष सुरु असलेली कामे, त्यामध्ये होत असलेली दिरंगाई,जमीन हस्तांतरणात येत असलेल्या अडचणी तसेच अन्य सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील.
तरी सर्व संबंधित यंत्रणानी महामार्गचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.
मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. पनवेल येथील पळस्पे फाटा येथून या पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली. हा महामार्ग एकूण १२ टप्प्यांत विकसित होत आहे. एकूण ४३९.८८ किमीपैकी पळस्पे फाटा (पनवेल) ते हातखांबा (रत्नागिरी) या 281 किलोमीटरच्या पल्यावरील कामाची पाहणी करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाच्या अधिका-यांकडून त्यांनी या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, त्यासाठी आवश्यक बाबी यांची त्यांनी माहिती घेतली. ही कामे लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिका-यांनी परस्पर समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी दिल्या.
या पाहणी दौऱ्यात मंत्री भोसले यांनी पलस्पे फाटा, पेण, वाशीनाका,गडब,आमटेम,नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणारे रोड या विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपारी सहाय्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 21-02-2025
