Navratri 2024 : पहिल्या माळेला जोतिबाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा

जोतिबा : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाच्या नवरात्रोत्सवास Navratri आज, गुरुवारपासून धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. पहिल्या माळेला जोतिबाची नागवल्ली पानातील महापुजा बांधून धुपारती सोहळ्याने डोंगरावरील सर्व मंदिरात घट बसविण्यात आले.

आज, पहाटे घंटानाद करुन मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाल्या. आज घटस्थापनेनिमित्त नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा बांधली होती. सकाळी ९ वाजता श्री’चे पुजारी उंट, घोडे, देव सेवक यांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळ्याला सुरवात झाली. धुपारती सोहळा मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घालून महिलांनी धुपारतीचे स्वागत करून औक्षण केले.

धुपारती सोहळ्यानंतर जोतिबा, काळभैरव, महादेव मंदीर, चोपडाई देवी, यामईसह इतर सर्व मंदिरात घट बसवण्यात आले. या सोहळ्यावेळी जोतिबा देवाचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांच्या सह गावकरी, पुजारी उपस्थित होते. आज भाविकांनी तेल अर्पण करून जोतिबाचे दर्शन घेतले. यावर्षी श्री जोतिबाचा जागर आठव्या दिवशी म्हणजेच गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने जोतिबाचा प्रसाद म्हणून लाडूच्या स्टॉलची सुरवात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:51 03-10-2024