रत्नागिरी : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावसजवळ गावडे आंबेरे पाटीलवाडी येथील मधुकर पाटील यांच्या विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वन विभागाने जीवदान दिले आहे.

दि. २० फेब्रुवारी रोजी गावडे आंबेरे पाटीलवाडी येथील रात्री मधुकर पाटील यांच्या दारामध्ये असलेल्या कुत्र्याला या बिबट्याने भक्ष्य करून पळवून नेल्याने सकाळी हा कुत्रा गायब होता. मात्र, विहिरीतील पाण्यात कसला तरी आवाज येऊ लागल्यामुळे त्यांनी विहिरीत पाहिले असता बिबट्या पडल्याचे लक्षात आले. भक्ष्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनात आले. याबाबत पाटील यांनी पोलिसपाटील श्रीमती आदिती लाड यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वन विभागाशी संपर्क केल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये पाणी असल्यामुळे बिबट्या डुबक्या मारत होता. अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीमध्ये पिंजरा सोडून त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यामध्ये कैद करुन सुखरूप पाण्याबाहेर काढले.

या बाबत वन विभागाशी संपर्क केला असता हा बिबट्या ८ वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या वेळी विहिरीत पडलेला हा बिबट्याला अखेर वन विभागाने सकाळी १०.३० च्या सुमारास पिंजऱ्याच्या माध्यमातून बाहेर काढून नंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 22/Feb/2025