मार्चमध्ये कशेडीचा दुसरा बोगदा सुरू होईल : मंत्री शिवेंद्रराजे भोसले

खेड : कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकतील विद्युत कामे व उर्वरित रस्त्याची कामे पूर्ण करून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलताना दिली आहे. गुरुवारी ना. भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. दरम्यान, कशेडी बोगद्याची पाहणी करताना त्यांनी ही माहिती दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले कोकण दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरा त्यांनी कशेडी बोगद्याची पाहणी केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, ऋषिकेश मोरे, शशांक सिनकर यांच्यासह सार्वजनिक बांधकामच्या अभियंता आशा जाटाळ, श्री. पावसे व कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्यात
ना. भोसले म्हणाले, मुंबईपासून राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या मार्गाच्या काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता या कामाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना सरकार करत आहे. कशेडी बोगदा हा महत्वाचा टप्पा आहे. या बोगद्याच्या कामाची माहिती मी अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्यात असून मार्चच्या पहिल्या आठवड्या पर्यंत दुसऱ्या बोगद्यातूनही वाहतूक सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 22/Feb/2025