SP Dhananjay Kulkarni : ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिस सदैव तत्पर : जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेला सदैव तत्पर आहेत, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी Dhananjay Kulkarni यांनी दिले. दिवसा वा रात्री केव्हाही आवश्यक असलेल्या वेळी ११२ क्रमांकावर फोन करा, १५ मिनिटांत नजीकच्या पोलिस ठाण्यातून अधिकारी हजर होईल, असे सांगितले. सध्याच्या प्रभावी तंत्रज्ञानाच्या युगात अनेक प्रकारांचे सायबर गुन्हे घडत आहेत आणि याला ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. मोबाईलवरील अपरिचितांशी संभाषण कटाक्षाने टाळा, असे आवाहनही त्यांनी केले.

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. नरहर वसाहत येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वयाची ७५, ८०, ८५ व ९० वर्षे पूर्ण झालेल्या तसेच वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला, तसेच सप्टेंबर महिन्यातील सभासदांचे वाढदिवसही साजरे करण्यात आले.

रत्नागिरी लायन्स क्लबने सक्रिय सहभाग घेतला होता. लायन्स क्लब अध्यक्ष गणेश धुरी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या या कार्यक्रमात सह‌भागी होऊन माता- पित्यासमान असलेल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले, याबद्दल रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. विजय निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्षा पद्मजा बापट यांनी
केले.

रस्ते निर्धोक करा
अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी पोलिस यंत्रणेशी संबंधित विषयावर त्वरित कार्यवाही करण्याबाबत तसेच रत्नागिरी शहरातील विशेषतः एसटी स्टॅन्ड ते विठ्ठल मंदिर या रस्त्यांवरील रामआळी आणि मारुती आळीतील फेरीवाले व भाजीविक्रेत्यांच्या सततच्या अतिक्रमणांचे उच्चाटन करून ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून निर्धोक चालण्यास सहकार्य करा, अशी आग्रही मागणी कुलकर्णी Dhananjay Kulkarni यांच्याकडे केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 03/Oct/2024