राजापूर : अर्जुना कालव्याच्या अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

पाचल : पंतप्रधान सिंचन योजनेतंर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊन देखील पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना कालव्याचे काम गेले दोन वर्षे रखडलेले आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्गामधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी पाटबंधारे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी या कामांकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

राजापूर तालुक्यातील अर्जुना प्रकल्प हा जिल्ह्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे पाहीले जाते. हा प्रकल्प पुर्णत्वाला गेला असून या धरणात पाण्याचा साठा देखील मुबलक प्रमाणात आहे. मात्र, कालव्याची कामे पुर्ण करण्यात आली नसल्याने परिसरातील शेतकरी धरण्याच्या पाण्यापासून आजही वंचित आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून कालव्याच्या कामासाठी दोन वर्षापुर्वीच कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे डाव्या व उजव्या कालव्याची कामे रखडलेली आहेत.

मागील वर्षी प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती जैसे थे ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेती करता न आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना वारंवार सांगून देखील त्यांनी याची दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकही पैसा मोबदला म्हणून दिलेला नाही.

त्यामुळे येथील शेतकरीवर्गामधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुर्वी या कालव्याचे काम ओपन कालवा पध्दतीने करण्यात येणार होते. मात्र, आता या कामात बदल करून बंदिस्त पाईपद्वारे करण्यात येत आहे. या कालव्याचे डाव्या उजव्या अशा दोन्ही बाजूने काम सुरू आहे. नियोजित मार्गातून पाईप लाईन टाकण्यासाठी जमीन खोदकाम सुरू आहे. मागील वर्षी पाईपलाईन टाकताना खोदलेली माती तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. खोदकाम करताना सापडलेले दगड न उचलता ते शेतातच ठेवण्यात आले. खोदलेले चर व्यवस्थित न भरल्याने त्यातून वाहून गेलेली माती इतरत्र शेतीत पसरली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 24/Feb/2025