वरवडे येथे घरात घुसून महिला, लहान मुले आणि पुरुषांना अमानुष मारहाण
रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे, खारवीवाडा येथे गावातील लोकांविरोधात न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरून एका जमावाने कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराचे दोन्ही दरवाजे तोडून आत घुसलेल्या जमावाने महिला, लहान मुले आणि पुरुषांना बेदम मारहाण करत घरातील साहित्याची प्रचंड मोडतोड केली. या प्रकरणी पीडित महिला कामिनी केशव पोवार यांनी रत्नागिरीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ५१ जणांविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
जुन्या खटल्यातील साक्षीचा धरला राग
या घटनेमागील पार्श्वभूमी पाहता, २४ जुलै २०२३ रोजी गावातील काही लोकांनी कामिनी पोवार यांच्या घरात घुसून शिवीगाळ केली होती. त्याविरोधात कामिनी पोवार यांनी रत्नागिरी न्यायालयात १८ लोकांवर खासगी फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी ७ जुलै २०२६ रोजी न्यायालयात झाली. या सुनावणीदरम्यान कामिनी यांचे दीर विश्वास पोवार आणि जाऊ संयुक्ता पोवार यांनी आरोपींविरोधात न्यायालयात महत्त्वाची साक्ष दिली.
न्यायालयात दिलेली ही साक्षच या हल्ल्यामागचे मुख्य कारण ठरली. आरोपींनी मनात तीव्र राग धरून, ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामिनी यांचे पती कामानिमित्त मुंबईला गेल्याची संधी साधली आणि गावातील ५१ जणांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह पोवार यांच्या घराभोवती जमा झाला.
दरवाजे तोडून घरात प्रवेश; महिला आणि लहान मुलांना अमानुष मारहाण
जमाव आक्रमक झाल्याचे पाहून भीतीपोटी कुटुंबाने आपल्या घराचे दोन्ही दरवाजे आतून बंद केले होते. मात्र, आक्रमक जमावाने दोन्ही दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि समोर दिसेल त्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
हल्ल्यादरम्यान जमावातील लोकांनी लाकडी दांड्याने मारल्यामुळे कामिनी यांच्या जाऊ संयुक्ता पोवार यांच्या खांद्याचे हाड फॅक्चर झाले आहे. तसेच कामिनी पोवार यांच्या पोटावर गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मारहाणीदरम्यान मध्यस्थी करायला आणि वाचवायला आलेल्या नणंदेलाही जमावाने “परत आलीस तर ठार मारू”, अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली.
३ तास सुरू होता थरार; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी
सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेला हा प्रकार दुपारी १२ वाजेपर्यंत सलग तीन तास सुरू होता, असे कामिनी यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून पीडित कुटुंबाने हे भीतीचे वातावरण दूर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. ५१ जणांच्या या जमावावर आणि हल्ला करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची विनंती पीडितांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 25-07-2026














