रत्नागिरी : महिला बचतगटांनी घेतले १७३ कोटी ९७ लाखाचे कर्ज

रत्नागिरी : उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू केलेल्या महिला बचतगटांसाठी कर्ज योजना राबवण्यात आली आहे. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार ८२९ बचतगटांनी १७३ कोटी ९७ लाख रुपयांचे कर्ज उचलले आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना हातभार लागला आहे.

ग्रामीण भागात रोजगाराचे प्रमाण कमी असल्यामुळे बहुतांश कुटुंबे हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. उत्पादनाचे कोणत्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही कमजोर होत जाते. त्यामुळे शासनाने उमेद अभियानांतर्गत बचतगटांना बळ देण्यासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या दोन वर्षांत प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्टे निश्चित करून दिली गेली होती. छोटे छोटे ग्रामीण भागातील महिलांना उद्योग करण्यासाठी बँकेकडून अर्थसाह्य दिले जाते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी बचतगट हे कर्ज उचलते. एक लाखापासून ते वीस लाखांपर्यंतच्या रकमेचे कर्ज त्यांना दिली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात उमेदअंतर्गत १५ हजार ६१० महिला बचतगट कार्यरत आहेत. बहुसंख्य बचतगट भाजीपाला, पापड, लोणच्यासारखे व्यवसाय करण्यावर भर देतात; मात्र गेल्या काही वर्षांत आंबा प्रक्रिया, मच्छी विक्री, आंबा व काजू बीचा विक्री व्यवसाय करण्यासाठी महिला एकवटत आहेत. त्यासाठी महिला छोटी छोटी यंत्रे खरेदी करतात. स्वतःची यंत्रणा असल्यामुळे महिला चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.

२०२४-२५ या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्याला ९ हजार ३०० बचतगटांना २३५ कोटी रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिलेले होते. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार ८२९ बचतगटांना १७३ कोटी ९७ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्याला ३० कोटींचे कर्जाचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत २७ कोटी रुपये कर्ज वितरित केले गेले आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळाले असून, भविष्यात या महिलांना चांगला फायदा घेता येईल. बचतगटातील महिलांनी मिळालेल्या कर्जाची रक्कम घरगुती गरजांसाठीही वापरली आहे.

त्यामुळे महिलांची आर्थिक गरज भागते. गतवर्षी कर्ज घेतलेल्या बचतगटांनी ते वेळेत फेडले आहे. हप्तेही वेळेत भरले आहेत. या योजेनेमुळे ग्रामीण भागातील महिलादेखील व्यवसायापासून वंचित न राहता उद्योगासाठी पुढे येतील. नीलेश धमाले, तालुका अभियान व्यवस्थापक, उमेद

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 27/Feb/2025