महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा शानदार सत्कार; आर्थिक साक्षरता कार्यशाळा घेणार असल्याचे संकेत
रत्नागिरी जिल्ह्यात महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी, समाज हा विश्वासावर आधारित असतो आणि महसूल यंत्रणेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेच्या आधी पूर्ण करून हा विश्वास अधिक दृढ करावा, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, मुद्रांक जिल्हाधिकारी विरसिंह वसावे, भूमिअभिलेख अधीक्षक सचिन इंगळी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव प्रमुख उपस्थित होते.
सकारात्मक दृष्टिकोन आणि सुसंवादावर भर: जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी ३० हजार दाखल्यांचे वितरण केले जाते. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी, तसेच सहकारी आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी आदरपूर्वक संवाद साधला पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले. महसूल विभागात तब्बल ६० टक्के महिला अधिकारी आणि कर्मचारी असून त्या कौटुंबिक जबाबदारीसह कार्यालयीन कामे अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडत असल्याबद्दल त्यांनी महिला कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी आणि योग्य आर्थिक नियोजनासाठी (बचत, गुंतवणूक व विमा) लवकरच मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वसामान्य माणसाचे समाधान हेच विकासाचे केंद्रबिंदू: अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे
गेल्या वर्षभरात आपण नागरिकांना किती समाधान दिले, याचे प्रत्येकाने स्वयंमूल्यमापन केले पाहिजे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केले. सामान्य माणूस हा सर्व विकासाचा केंद्रबिंदू असून त्याच्याशी सुसंवाद साधून त्याचे कामकाज सुलभ करणे आणि त्याला दर्जेदार सेवा देणे हाच महसूल यंत्रणेचा मुख्य दृष्टिकोन असायला हवा, असे ते म्हणाले.
उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा गौरव
महसूल दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला:
- मुख्यालयीन अधिकारी व कर्मचारी: अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार संजय भालेराव, नायब तहसीलदार दीपक कुळ्ये, लघुलेखक अमोल पाळेकर, सहाय्यक महसूल अधिकारी अभिजीत शेट्ये, महसूल सहाय्यक अजित पिलणकर, वाहनचालक अल्लाउद्यीन तडवी, शिपाई विलास पागडे.
- क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी: उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, नायब तहसीलदार अनिल गोसावी, सहाय्यक महसूल अधिकारी माधवी दाभाडे, मंडळ अधिकारी संतोष गंगाराम पांचाळ, महसूल सहाय्यक प्रविण प्रकाश सावंत, ग्राममहसूल अधिकारी हर्षुला पांडुरंग बोरसा, वाहनचालक नंदकुमार अनंत कदम, शिपाई शैलेश अनंत सपाटे, पोलीस पाटील मनोहर पांडुरंग दळवी, महसूल सेवक राहुल रविंद्र महागावकर.
- गुणवंत पाल्य (१२ वी): माविया समीर सावंत, वैष्णवी संदीप आयरे.
- गुणवंत पाल्य (१० वी): चिन्मय प्रकाश टिपुगडे, मृण्मयी मनोज ठसाळे, पार्थ प्रकाश झोरे, अजिंक्य योगेश आपटे, शौर्य चंद्रकांत सानप, वेदांत समीर शेट्ये, प्रियल हणमंत ऐवळे, वेदांत जयंत राऊत, अन्विका अमोल गर्दे.
कार्यक्रम प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. दीपप्रज्ज्वलन व गणेश वंदनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी अर्चना पटवर्धन यांनी केले, तर तहसीलदार संजय भालेराव यांनी आभार मानले.














