रत्नागिरी : ‘आरटीई’अंतर्गत ६०४ विद्यार्थ्यांची निवड

रत्नागिरी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार (आरटीई) खासगी शाळेत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. जिल्ह्यातील ९१ खासगी शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली होती. ७८२ जागेसाठी एकूण ९०७ प्रवेशअर्ज दाखल झाले होते. लॉटरी पद्धतीने ६०४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी अवघ्या ३३ विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी पुढाकार घेतला आहे.

लॉटरी पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवण्यात आले आहेत. त्या विद्यार्थ्यांचा आज (ता. २८) फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची सूचना शिक्षण विभागातर्फे करण्यात आली आहे. प्रवेशासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना पालकांकडून प्रवेशासाठी थंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे शासनाकडून बहुधा आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत विविध कारणे आहेत. आवडीची शाळा न मिळणे, कागदपत्रांची जुळवाजुळव न होणे, पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचा संदेश वेळेवर न प्राप्त न होणे, शेवटच्या दोन दिवसांत प्रवेश घेण्याची मानसिकता असल्याने प्रवेशप्रक्रियेला विलंब होत आहे. ज्या विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली आहे

त्या विद्यार्थ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत पंचायत समिती स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. शिक्षण विभागाची सूचना असतानाही प्रवेशप्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे. या प्रवेशासाठी निवडयादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना नोंदवलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच अलॉटमेंट लेटरची प्रिंट सोबत न्यावी. आरटीई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंटही घेऊन जावी. प्रवेश ऑनलाइन निश्चित झाल्याची पावती पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. ५७१ जागांवर प्रवेश होणे बाकी आहे.

शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा
आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या पालकांनी तातडीने संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. प्रवेशाबाबत काही समस्या उद्भवल्यास शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी बी. एस. कासार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 28/Feb/2025