Amba Ghat Traffic: आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद; कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

आंबा घाटात रस्त्याला भेगा; अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

रत्नागिरी: आंबा घाट वाहतूक बंदीबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी तातडीने महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. रस्ता खचण्याची मोठी शक्यता निर्माण झाल्याने, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आंबा घाटातून जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) या मार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. भौगोलिकदृष्ट्या आंबा घाट हा तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासाठी अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो. सतत पडणाऱ्या पावसामुळे किलोमीटर ६९.५०० ते ६९.६०० दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या बाधित टप्प्याला लागूनच सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचल्यास मोठी जीवितहानी होण्याचा स्पष्ट धोका NHAI च्या अहवालात वर्तवण्यात आला होता. या तांत्रिक अहवालाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३१ जुलै २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत या मार्गावरील सर्व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि हलकी प्रवासी वाहने यांनाच नियंत्रित वेगाने व योग्य ती खबरदारी घेऊन प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अवजड वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गाची व्यवस्था केली असून, अवजड वाहनांना ‘रत्नागिरी – हातखंबा – पाली – अणुस्कुरा घाट – राजापूर/कोल्हापूर’ या मार्गाने वळवण्यात आले आहे. याशिवाय स्थानिक प्रशासनाने भुईबावडा घाट किंवा फोंडा घाटाचा पर्याय वापरण्याचे आवाहनही केले आहे.

या प्रतिबंधात्मक आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर (चेक पोस्ट) पुरेशा पोलीस बंदोबस्ताची तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बाधित क्षेत्रात तात्काळ धोक्याची सूचना देणारे फलक, रिफ्लेक्टीव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या प्रवासासाठी ब्लिंकर्स बसवण्याची सूचना केली आहे. या भागातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा वाहनांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 01-08-2026