सोलापूर : शिवशाही बस सुरू असताना ब्रेक आणि दरवाजा हवेच्या दाबाचा काम करतो. बस बंद होताच एक तासाच्या आत हवेचा दाब कमी झाल्यानंतर बसचा दरवाजा ‘अनलॉक’ होतो. पुण्यात स्वारगेट येथे झालेल्या अत्याचार प्रकरणातील नराधमाने या तांत्रिक त्रुटीचा फायदा उचलला. संबंधित बस ही सोलापूर आगाराची आहे. त्या बसचालकाकडून माहिती घेतली असता त्याने शिवशाही बसचे सत्य समोर आले.
सोलापूर आगाराचे चालक शंकर लालू चव्हाण हे मंगळवारी (ता. २५) रात्री पावणेदहाची सोलापूर स्वारगेट (एम. एच. ०६ बी डब्ल्यू ०३१९) ही बस घेऊन पुण्याकडे गेले. स्वारगेट स्थानकावर बुधवारी (ता. २६) पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी ही बस पोचली. बस बाजुला उभी करून चव्हाण हे सोलापूर आगारासाठी असलेल्या विश्रामकक्षात जाऊन झोपले. सकाळी दहा वाजता स्वारगेट बसस्थानकावरील सुरक्षारक्षकांनी त्यांना झोपेतून जागे केले आणि एसटीच्या अधिकाऱ्याने त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला.
तोपर्यंत त्यांना घडलेल्या घटनेबद्दल काहीही माहीत नव्हते. ‘शिवशाही’ बस ही वातानुकूलित बस आहे. हवेच्या दाबाचे बटन दाबल्यानंतर दरवाजा उघडतो आणि बंद होतो. ही यंत्रणा बस सुरू असताना सुरळीत चालते. मात्र, बस बंद झाल्यानंतर साधारणतःः एक तासभर हवेचा दाब कायम राहतो. त्यानंतर हळूहळू हवेचा दाब उतरल्यानंतर हा दरवाजा कोणीही हाताने उघडू शकते अथवा बंद करू शकते. यामुळे एक तासानंतर ही बस ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशा परिस्थितीत येते. याच तांत्रिक त्रुटीचा फायदा संबंधित नराधमाने उचलला, असे चालकाने सांगितले.
विनाथांबा बस
सोलापूर-स्वारगेट ही बस विनाथांबा आहे. या गाडीचे आरक्षण सोलापूरमधून तसेच मोहोळ, टेंभुर्णी येथून होते. या गाडीत वाहक नसतो. फक्त चालकच ही गाडी घेऊन जातात. यामुळे चव्हाण हे एकटेच हे गाडी घेऊन गेले होते. दरम्यान, संबंधित बस पंचनाम्यासाठी पुणे येथेच असून चालक सोलापूरला आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 28/Feb/2025














