रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार मच्छीमार व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने ३ मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनेष राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी दिली.
शेतकऱ्यांमध्ये व मच्छीमारांमध्ये राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. मच्छीमारांचे व शेतकऱ्यांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याची पूर्ततेसाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नाही. सत्तेत येण्या करिता आश्वासनांचा पाऊस पाडून सत्तेत येताच महायुती सरकार शेतकऱ्यांकडे, मच्छीमारांकडे व सामान्य जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून शासकीय रुग्णालयात डॉक्टर ची कमतरता आहे. अनेक पदे रिक्त आहेत, शिकाऊ डॉक्टर रुग्णांचा इलाज करत आहेत. महाराष्ट्र शासनाचा रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
सोमवारपासून (३ मार्च) राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये शासनाने शेतकऱ्यांचे, मच्छीमारांचे व जनतेचे प्रश्न सोडवावेत अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या व जनतेच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ मार्च रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे हारीस शेकासन यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे, रमेश कीर, सहदेव बेटकर, रूपाली सावंत, अनिरुद्ध कांबळे, रमेश शहा, टी डी पवार, विभावरी जाधव, हनीफ खलफे, अशोक जाधव, दीपक राऊत, ॲड अश्विनी आगाशे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनेष राऊत यांनी केले आहे.
महायुती सरकारच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह व महिला काँग्रेस, सेवा दल, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, इंटक, अल्पसंख्यांक विभाग, अनुसूचित जाती जमाती विभाग, ओबीसी सेल, पर्यावरण सेल इतर सर्व विभाग व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील आजी-माजी जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन मनेष राऊत यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:39 AM 01/Mar/2025














