मराठी भाषेचा वापर वाढवूया : डॉ. बळवंत दाभाडे

पाचल : मराठी ही आपली राजभाषा आहे. राजभाषा असूनही तिला आपण सन्मान देत नाही. आपण दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवला पाहिजे. आपल्या भाषेचा गौरव वाढवण्यासाठी आणि मायबोलीच्या संवर्धनासाठी आपण मराठी भाषेचा वापर वाढवूया, असे आवाहन डॉ. बळवंत दाभाडे यांनी केले.

ते राजापूर तालुक्यातील पाचल येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात मराठी भाषा व वाङ्‌मय मंडळ आयोजित मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राबरोबरच गोवा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांबरोबरच जगभरात अनेक ठिकाणी मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. मराठी भाषा आणि संस्कृती सर्वदूर पोहोचली आहे. सोशल मीडियावर आपणाकडून मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे. हा वापर वाढवून आपण मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार वाढवला पाहिजे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एस. व्ही. निंबाळकर, मराठी भाषा व वाङ्‌मय मंडळ प्रमुख डॉ. विकास पाटील, प्रा. पवन राठोड उपस्थित होते. यावेळी मराठी राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. विकास पाटील यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून दिली. प्रा. एस. व्ही. निंबाळकर म्हणाले की, आपण दुसऱ्यांच्या भाषेचे अनुकरण करतो. आपण आपली भाषा अधिक वापरल्यास दुसराही आपल्या भाषेचे अनुकरण करेल. आपण ज्यांना अशिक्षित स्त्रिया म्हणतो, त्या स्त्रियांनीही मौखिक परंपरेने लोकसाहित्याचे जतन केले होते. याउलट सुशिक्षित पिढी या साऱ्यापासून दूर जात आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या लोकसाहित्याचे जतन करूया आणि मराठी भाषेचा गौरव वाढवूया, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. पी. पी. राठोड यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 01/Mar/2025