टंचाई आराखड्यात लांज्यातील ९२ वाड्यांचा समावेश

लांजा : दरवर्षी डिसेंबर ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ४९ गावे आणि ९२ वाड्यांचा समावेश असलेल्या १ कोटी ३६ लाख रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.

लांजा तालुका आणि पाणीटंचाई यांचे जणू काही वर्षानुवर्षाचे घट्ट नाते बनल्यासारखे चित्र आहे. पाणीटंचाई निवारणसाठीचा दरवर्षीचा खर्च पाहिला तर तो तो जवळपास कोटींच्या घरात जाईल. मग इतका खर्च करूनही तालुक्यातील पाणीटंचाई कमी होत नाही.

टंचाईग्रस्त गाव व त्यामधील वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, जलसाठ्यात वाढ करणे, विहिरी दुरुस्ती करणे, नळपाणी योजना दुरुस्ती, विहिरीचा गाळ उपसा बंधारे बांधणे यावर चर्चा करून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो.

दुर्गम भागातील गावांना प्रथम पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असते. या दृष्टीने तयार केलेला कृती आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण ४९ गावे व ९२ वाड्यांचा समावेश आहे. आराखड्यातील गावे पालू, कोंडगे, कोचरी, प्रभानवल्ली, देवधे, वनगुळे, आडवली, आगावे, आरगाव, आंजणारी, आसगे, इसवली, इंदवटी, निओशी, कणगवली, उपळे, कोंड्ये, कोलचे, कोट, कोर्ले, कुणें, कुरंग, खानवली, खावडी, गोविळ, गवाणे, गोळवशी, जावडे, झापडे, तळवडे, निवसर, पन्हळे, पुनस, बेनीखुर्द, बेनी बु., भडे, भांबेड, माजळ, मठ, रावारी, बापेरे, रिंगणे, रुण, वेरवली बुद्रुक, वेरळ, वेरवली खुर्द, वाघ्रट, वाकेड, विलवडे, व्हेळ, वाडगाव, वाघणगाव, विवली, शिपोशी, शिरवली, सालपे, साटवली, हर्चे, हर्दखळे, खोरनिनको, कोल्हेवाडी आणि कुरचुंब.

तालुक्यात सर्वांत खोल पाणी
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दर तीन महिन्यांनी भूजलपातळी मोजण्यात येते. त्याप्रमाणे जानेवारी महिन्यात जिल्ह्याची भूजलपातळी घेण्यात आली. त्यामध्ये लांजा तालुक्यातील ३ ठिकाणच्या विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाणीपातळी ८. २७ मीटर इतकी खोल असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनाला आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 01/Mar/2025