खेड : थकित वीज बिल वसुलीसाठी महावितरणचे ४०० कर्मचारी तैनात

खेड : तालुक्यातील वीज ग्राहकांकडे महावितरणची १३ कोटींहून अधिक थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी आहे. थकित बिलांची वसुली करण्याचे महावितरणसमोर मोठे आव्हान आहे. महावितरणकडून चारही उपविभागांत तब्बल ४०० हून अधिक कर्मचारी वसुलीसाठी तैनात केले आहेत. यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दोन-तीन वेळा सूचना देवूनही बिले भरण्यास कुचराई करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तालुक्यातील थकित वीज ग्राहकांना महावितरण कर्मचाऱ्यांनी यापूर्वी तोंडी सूचना देत वीज बिले तातडीने भरण्याबाबत सूचित केले होते. सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या ग्राहकांना रितसर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. महावितरणने फेब्रुवारी महिन्यातच थकित ग्राहकांकडील बिले वसुलीसाठी पथके तैनात करत वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली. महावितरणने अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केल्यानंतर अनेक ग्राहकांनी स्वतःहून महावितरणच्या वीज भरणा केंद्रासह पतसंस्थांमधील वीजभरणा केंद्रांकडे देयके भरणे पसंत केले होते.

सद्यःस्थितीत तालुक्यातील ४ उपविभागांतील वीज ग्राहकांकडे १३ कोटींहून अधिक थकबाकी शिल्लक आहे. ही थकित रक्कम वसूल करून मार्चअखेरपर्यंत उद्दिष्टपूर्तीसाठी महावितरणने कंबर कसली आहे. प्रत्येक उपविभागात ९० हून अधिक कर्मचारी थकित बिलांच्या वसुलीसाठी दारोदारी फिरत आहेत. सुरुवातीला दोन-तीन वेळा सूचना देत वीज बिले भरण्यास मुभा दिली जात आहे. मात्र, तरीही बिले भरणा करण्यास कानाडोळा करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 03/Mar/2025