धूपप्रतिबंधक बंधाऱ्याअभावी गावखडी किनाऱ्याची धूप

पावस : सागरी मार्गावरील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या लाटांमुळे सुरुबन याची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे परिसराला धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या कामाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे सुरुबनाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

समुद्राच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात लोकवस्तीजवळ पाणी घुसत होते. त्यामुळे वनविभागाच्या माध्यमातून वस्तीमध्ये घुसणारे पाणी थांबविण्यासाठी सुरुबनाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे किनाऱ्यावरील भाग संरक्षित झाला. त्यानंतर या भागातून सागरी मार्गाची निर्मिती झाली. तसेच परिसरातील अनेक भाग लागवडीखाली आला. मात्र, त्यानंतर दिवसेंदिवस पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावरील लाटांच्या तडाख्यामुळे किनारपट्टीची धूप होऊ लागली आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी सखल भागात घुसत आहे.

दोन वर्षांपूर्वी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी तत्कालीन खासदार विनायक राऊत यांनी केली होती आणि धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानंतर अधिकारी त्या भागाची पाहणी करून गेले.

परंतु, दोन वर्षांत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे लाटांच्या तडाख्यामुळे सुरुबन नष्ट होऊ लागले आहे. वादळामुळेही येथील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे या किना-यावर धूपप्रतिबंधक बंधारा न बांधल्यास भविष्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी घुसण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे तत्कालीन खासदार विनायक राऊत यांनी या परिचराची पाहणी करून परिस्थिती जाणून घेऊन बंधारा बांधण्यासाठी निधीचे आश्वसान दिले होते. मात्र, त्यानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे या किनाऱ्यावर भविष्यात धोका वाढण्याची शक्यता आहे. याबाबत पाठपुरावा करूनही अद्याप काम सुरू झालेले नाही- दिलीप पाटील, ग्रामस्थ, गावखडी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 03/Mar/2025