राजापूर : तालुक्यातील अर्जुना-कोदवली नदीपात्रात वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुराची तीव्रता कमी झाली असून, सातत्य राहिलेले नाही. मुसळधार पाऊस झालाच तर दोन्ही नद्यांना पूर येतो. दोन वर्षांत नदीपात्रातील अडीच लाख घनमीटर गाळ काढला गेला. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळाला आहे. यंदा सलग तिसऱ्या वर्षी निधी मिळाल्यामुळे गाळ उपशाचे काम वेगाने सुरू आहे.
राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांना पावसाळ्यात येणारा पूर ही मोठी समस्या बनलेली आहे. वारंवार येणाऱ्या पूरामुळे निश्चित केलेली पूररेषा शहर विकासात अडथळा ठरत आहे. त्यामुळे पुरापासून सुटका करण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला नाम फाऊंडेशनची साथ मिळाली. लोकसहभागातून गाळ उपशाला सुरुवात झाली.
येथील सर्वेक्षणात अर्जुना नदीपात्रात सुमारे ३.२० लक्ष घनमीटर गाळ साचल्याचे पुढे आले. मागील दोन वर्षांत अडीच लाख घनमीटर गाळ काढला गेला. त्यामुळे अर्जुना नदीपात्र रुंदावले आहे. गाळ उपशापूर्वी नदीपात्राची रुंदी २५ ते ३० मीटर होती. ती आता ५० ते ६० मीटर झाली आहे. गाळाने भरलेले अरुंद अर्जुना नदीच्या पात्राने मोकळा श्वास घेतला आहे. नदीपात्रातील पाणी सहज वाहून जात आहे. गाळ उपसल्यामुळे पूर समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. दरवर्षी राजापूर शहराला पुराचा वेढा पडतो. काही तासांत बाजारपेठेत पुराचे पाणी शिरते. मात्र, या पावसाळ्यात गाळ उपशामुळे पुराची तीव्रता कमी झाली असून सातत्य राहिलेले नाही. मुसळधार पाऊस झालाच तर पूर येत होता.
अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीची तीव्रता कमी होत आहे. येथील नदीपात्रही मोकळे झाले आहे. काही वर्षांनंतर किनाऱ्यावर टाकलेला गाळ पुन्हा नदीपात्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळ नदीकाठी न ठेवता अन्यत्र टाकण्यात यावा. यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. – विवेक गुरव, व्यापारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 03/Mar/2025














