गणपतीपुळेतील महिला बचत गटांच्या वस्तू विक्री प्रदर्शनात परदेशी पर्यटकांकडून हापूसची खरेदी

रत्नागिरी : महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) गणपतीपुळे येथे आयोजित केलेल्या महिला बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शनात सव्वालाखाची उलाढाल झाली. याठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या फ्रान्स व इटली येथील परदेशी पर्यटकांनी हापूस आंबा खरेदी करतानाच स्वतःहून वस्तू बनविणाऱ्या महिलांचे कौतूक केले. चार परदेशी पर्यटकांनी कोकणी मेव्यासह अन्य वस्तूंची सुमारे अकरा हजार रुपयांची खरेदी केली.

गणपतीपुळे येथे सुरू झालेल्या माविमच्या या प्रदर्शनाचे उद्द्घाटन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव, महिला व बाल विकास विभागाचे महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांत हावळे, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या पत्नी श्रीमती पूजा गोसावी यांच्या उपस्थितीत झाले.

यामध्ये खेड, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वरमधील ५५ महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला, परराज्यातील तसेच विदेशी पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. उ‌द्घाटनावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव श्री. सातव यांनी महिला दिनानिमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, महिलांना खऱ्या
अर्थाने सक्षम करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ करत आहे.

महिलांनी नुसते संसारिक भाग न सांभाळता त्यांनी कायदेविषयक जाणीव करून घेतली पाहिजे. तसेच श्रीमती गोसावी यांनी ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवित असलेल्या या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

गणपतीपुळे येथे सुरू असलेल्या बचत गटांच्या प्रदर्शनाला इटलीतील दोन तर फ्रान्समधील दोन पर्यटकांनी भेट दिली. त्यांनी सर्व स्टॉलची पाहणी करून वस्तूंची खरेदीही केली. इटलीतील

पर्यटक पॅड्रीक यांनी ७५०० रुपयांची खरेदी केली. महिलांनी बनविलेल्या बांबूच्या टोपल्या पाहून त्या पर्यटकांनी आश्चर्य व्यक्त केले. महिलांची आठवण म्हणून या टोपल्या खरेदी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिला चांगले काम करीत असल्याचे माविमचे अधिकारी अंबरीष मेस्त्री यांना सांगितले. त्या पर्यटकांनी काजू, इमिटेशन ज्वेलरी, आंबा पल्प, जायफळ लोणचे खरेदी केले. त्याचबरोबर तोणदे येथील सिद्धिविनायक बचत गटाने विक्रीसाठी ठेवलेले हापूस आंबे फ्रान्समधील महिला पर्यटक जेरी आणि शिवान यांनी खरेदी केले. एका डइनाचा २ हजार ५०० रुपये दर होता.

यावेळी जेरी यांनी सांगितले, आम्हाला दर्जेदार हापूस आंबे हवे होते. या प्रदर्शनात चांगले आंबे मिळाले आहेत. याप्रसंगी मेस्त्री यांनी हापूस आंबे पाच दिवसांनी खाण्यायोग्य तयार होतील असे सांगितले. या प्रदर्शनात खेड येथील एका बचत गटाने बांबूच्या चिंध्यापासून तयार केलेल्या वस्तू इटलीमधील पेंड्रीक यांनी विकत घेतल्या. ते पर्यटक गेले तीन दिवस गणपतीपुळेत वास्तव्याला आले आहेत.

रत्नागिरीत बचत गटांसाठी विक्री केंद्र
‘माविम’च्या बचत गटांना कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला कायमस्वरूपी बाजार पेठ मिळावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या तीन टक्के निधीतून रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे माविमला ११ गाळे उपलब्ध करून दिले आहेत. तसेच शासनाने यशस्विनी पोर्टलची निर्मिती केली असून, महिला बचत गटांनी तिथे उत्पादनांची नोंदणी करावी, असे आवाहन श्री. हावळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 03/Mar/2025