मुंबई : गोरगरिबांचा दिवाळी, दसरा निवडणूक वर्षांमध्ये गोड करणाऱ्या आनंदाच्या शिधा या योजनेला अखेर ब्रेक लागला असल्याचे वृत्त आहे. महायुती सरकारने २०२२ ला सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ ही योजना बंद करण्यात आली असल्याची माहिती आहे.
यंदाच्या गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून माफक दरात दिल्या जाणाऱ्या वस्तू यापुढे जनतेला बाजारभावानेच खरेदी कराव्या लागणार आहेत. राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढत असल्याने विविध योजनांना कात्री लावली जात असून त्यामध्ये ‘आनंदाच्या शिधा’ या योजनेचादेखील समावेश झाला आहे.
या ‘आनंदाच्या शिधा’ योजनेत सणावारांच्या निमित्ताने शिधापत्रिकाधारकांसाठी शंभर रुपयांत एक किलो या प्रमाणात तेल, रवा, चणाडाळ आणि साखर दिली जात असे. जवळपास १ कोटी ६० लाख पात्र लाभार्थीना या किटचे वाटप केले जात होते. त्यासाठी प्रत्येक सणाला ३५० कोटींची तरतूद करण्यात येत होती. ३०० ते ३५० रुपयांच्या किमतीच्या या सर्व वस्तू १०० रुपये इतक्या माफक किमतीमध्ये दिल्या जात होत्या.
जनतेचा मोठा प्रतिसाद
रेशनिंग दुकानांच्या मार्फत २०२२ च्या दिवाळीमध्ये प्रथमच आनंदाचा शिधा पात्र लाभार्थ्यांना दिला गेला. त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने २०२३ मध्ये गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला, तर २०२४ मध्ये या सणांबरोबरच अयोध्येला श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानेही शिध्याचे वाटप करण्यात आले होते. निवडणूक काळामध्ये आनंदाच्या शिध्याच्या किटवरती सत्ताधाऱ्यांची छायाचित्रे छापण्यात आल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 03/Mar/2025














