रत्नागिरी : संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार शिक्षकांची नियुक्ती पटसंख्येच्या आधारे न होता आधार व्हॅलिडच्या संख्येनुसार होत आहे. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे शिवाय नवीन संचमान्यतेमुळे जिल्ह्यातील १ हजार ३०५ शाळा बंद होण्याचा धोका संभावत आहे.
शासनाने संचमान्यतेचे सुधारित धोरण गतवर्षी १५ मार्च २०२४ ला जाहीर केले होते; मात्र यावर्षीपासून त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी होण्याची शक्यता आहे. नवीन निकषानुसार प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षकपदे निश्चित करण्यात येणार आहेत. गावोगावी खासगी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव सुरू झाल्याने विद्यार्थी संख्या विभागली जात आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या घटली आहे तसेच नोकरी रोजगारासाठी शहरात किंवा अन्य गावांत पालक स्थलांतरित होत आहेत. त्यातच इंग्रजी माध्यमांचे आकर्षण असल्यमुळे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत न घालता शहरात खासगी शाळेत दाखल करण्याची वृत्ती वाढली आहे. अलीकडे स्पर्धा परीक्षांचा प्रभाव अधिक असल्यामुळे काही अकादमी ठराविक वर्षांचा अभ्यासक्रम निश्चित करत असल्यामुळे अकादमीत प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे.
दरम्यान, नवीन संचमान्यतेच्या धोरणानुसार पदवीधर शिक्षक, साहाय्यक शिक्षक यांच्यासह एकूणच शिक्षकसंख्या कमी होणार आहे. लहान शाळांना तिसरा शिक्षक मंजुरीसाठी ६१ पटसंख्येची असलेली अट आता ७६ पर्यंत वाढण्यात आली आहे. २१० पेक्षा जास्त पटसंख्या असेल तेथे पुढील प्रत्येक शिक्षकांसाठी ३० विद्यार्थी आवश्यक आहेत.
शिक्षकांमधून संताप
नवीन संचमान्यता धोरणाविरोधात शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या धोरणानुसार समाजशास्त्र पदवीधर उमेदवार हद्दपार होणार आहेत. नवीन धोरण मागे घेण्याची मागणी शिक्षक संघटनांमधून करण्यात येत आहे. शिक्षकांची नियुक्ती पटसंख्येच्या आधारे न होता आधार व्हॅलिडच्या संख्येनुसार केली जाणार असल्यामुळे अनेक शिक्षक कमी होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 04/Mar/2025














