मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्गच्या संपर्कमंत्रिपदी उदय सामंत

रत्नागिरी : पक्ष संघटना मजबूत करण्याच्या द़ृष्टीने भाजपा पाठोपाठ शिवसेनेनेही आपल्या मंत्र्यांकडे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मुंबई उपनगर, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष वाढीत आघाडी घेतली आहे. पक्षातील पदाधिकार्‍यांना राज्यात न्याय मिळावा, या हेतूने शिवसेनेचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री म्हणून सेनेच्या 11 मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष वाढीसह संबंधित जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळावे, हा नियुक्त्यांचा प्रमुख उद्देश आहे.

मंत्री उदय सामंत यांचे मुंबई उपनगर, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले काम असून, त्यांच्याकडे पक्षवाढीची जबाबदारी सोपवली आहे. मंत्री सामंत यांनी यापूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. सिंधुदुर्गमध्ये त्यांनी चांगली पक्षबांधणी केली होती. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार नीलेश राणे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

उदय सामंत यांचे मूळ गाव सिंधुदुर्गमध्ये आहे. ठाकरेंच्या सरकारमध्ये सामंत यांच्यावर पुण्याची जबाबदारी संपर्कमंत्री म्हणून होती. त्यावेळी त्यांनी पुण्यात चांगले काम केले आहे. पुण्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे मंत्री आहेत.

Mahrashi karve ANM

मुंबई उपनगरमध्येही युवा सेना व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री सामंत यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने तीन जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून संपर्क मंत्रिपदाचे नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 05-03-2025