रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मालमत्ता कर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेले तीन दिवसांत २४ मालमत्तांवर जप्तीची नोटीस चिटकवण्यात आली आहे. त्याचबरोबर मालमत्ता कर थकीतदारांच्या २५ नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. मालमत्ता कराची आतापर्यंतची वसुली ५० टक्के असल्याचे वसुली विभागाचे अधिकारी नरेश आखाडे यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरात ३१ हजार २६० मालमत्ता आहेत. यामध्ये घरे, दुकाने, बंगले, सदनिकांचा समावेश आहे. या मालमत्तांमधून सुमारे १४ कोटी रुपयांची कर वसुली करण्याचे लक्ष्य आहे. गेल्या जानेवारी महिन्यापर्यंत या सर्व मालमत्ताधारकांना घरपट्टी मागणी बिले देण्यात आली. त्यानंतर ही बिले भरण्यासाठी घरोघरी जाऊन विनंती करण्यात आली. घंटागाड्यांवरील ध्वनीक्षेपकावरुन कर भरण्याची आवाहन करण्यात आले. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जप्ती पथके कार्यान्वित झाली.
वसुली पथकाच्या जप्ती पथकाने मार्च महिना सुरु झाल्यापासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. वसुली विभागाचे अधिकारी नरेश आखाडे, उत्तम पाटील, राजन पवार यांच्या नेतृत्वाखाली थकीत करदारांच्या मालमत्ता जप्त केल्या जाऊ लागल्या. काही थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या. त्यानुसार जप्ती पथकाने २४ मालमत्ता जप्त केल्याअसून २५ नळकनेक्शन खंडीत करण्यात आली आहेत. ही मोहिम अशीच पुढे चालू राहणार असल्याचे अधिकारी आखाडे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 05/Mar/2025














