मुंबई : भारताने 12 वर्षांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं असून भारतभर त्याचा जल्लोष साजरा केला जातोय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही कामगिरी केली असून पंतप्रधानांपासून जगभरात त्याचं कौतुक केलं जात आहे.
पण सर्वाधिक लक्ष वेधलं गेलंय ते एका ट्वीटने. रोहित शर्मा हा जाड्या आहे, अपयशी कर्णधार आहे असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांनी आता रोहित शर्माचे कौतुक केलं आहे. त्त्यांनी रोहितच्या खेळीला सलाम ठोकला आहे. हिटमॅन रोहितच्या कर्णधारपदाला सलाम असं त्यांनी म्हटलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. त्यानंतर शमा मोहम्मद यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या म्हणतात की, X वर पोस्ट करत शमा मोहम्मदने लिहिले, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्याबद्दल आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. शानदार 76 धावा करून विजयाचा पाया रचणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला सलाम. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी महत्त्वपूर्ण खेळी खेळून भारताला विजयाकडे नेले. टीम इंडियाचा एक संस्मरणीय विजय.
काही दिवसांपूर्वी शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माशी संबंधित एक वक्तव्य केलं होतं. रोहित शर्मा जाड असून तो फिट नाही. आतापर्यंतच्या कर्णधारांमध्ये तो सर्वात निष्रभ कर्णधार आहे असं शमा मोहम्मद यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर याच शमा मोहम्मद यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
टीम इंडियाच्या या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी अभिनंदन केले. X वर टीम इंडियाचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले, एक विलक्षण खेळ आणि एक विलक्षण निकाल! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी देशात आणल्याबद्दल आमच्या क्रिकेट संघाचा अभिमान आहे. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली. उत्कृष्ट कामगिरीसाठी आमच्या संघाचे अभिनंदन.
भारत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
रोहित शर्माच्या भारतीय टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. दुबईच्या मैदानात झालेल्या थरारक फायनलमध्ये न्यूझीलंडला त्यांनी चार विकेट्स आणि एक ओव्हर राखून पराभूत केलं. तब्बल 12 वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला.
अंतिम सामन्यात विजयासाठीचं 252 धावांचं आव्हान भारताने 49 षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. रोहित शर्माच्या 76 आणि श्रेयस अय्यरच्या 48 धावांच्या खेळीने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. रोहितने 7 चौकार 3 षटकार तर श्रेयसने 2 चौकार 2 षटकार ठोकले. त्याआधी कुलदीप, वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन विकेट्स घेत किवी टीमला सात बाद 251 वर रोखलं. जडेजाने 10 ओव्हर्समध्ये अवघ्या 30 धावा देत एक फलंदाज बाद केला. मिचेलने 101 चेंडूंत 63 तर, ब्रेसवेलने 40 चेंडूंमध्ये नाबाद 53 धावा करत किवींना अडीचशे पार नेलं. या विजयामुळे होळीआधीच भारताने विजयाचा रंग उधळलाय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 10-03-2025
