झरेवाडी येथे पाणलोट रथयात्रा

पावस : पाणलोट रथयात्रा मृदा व जलसंधारणाचे महत्त्व वाढावे आणि पाणीटंचाईवर मात करणे या उद्देशाने काढण्यात आली आहे. ग्रामस्थांमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना रुजवण्याचा प्रचार या वाटरशेड यात्रेतून केला आहे. विविध कार्यक्रमांद्वारे त्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्नही सुरू आहे, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख यांनी केले.

भूमिसंसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार-मुदा व जलसंधारण विभाग आयोजित प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतर्गत झरेवाडी व पाली येथे आलेल्या पाणलोट रथयात्रेच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी झरेवाडी, उसे व चिंद्रवली या परिसरातील पाणलोट समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

गावातील ढोल-ताशा पथकाने या यात्रेचे कलाविष्कार सादर करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. जल ही जीवन है, जल है तो करत है. पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा देण्यात आल्या. प्रकल्प यंत्रणा तथा मंडळ कृषिअधिकारी पाली विनायक अवरे यांनी पाणलोट रथयात्रेची माहिती दिली.

फिरोज शेख यांनी पाणलोट कामांचे महत्व व त्यांचे कृषी कामांसाठी असलेले महत्व सांगितले. याप्रसंगी शालेय विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पदके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे व प्रकल्प कार्यान्वयिन यंत्रणा विनायक अधेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आहे. यावेळी ग्रामस्थांना वॉटर शेड किट वितरण करण्यात आले. दुपारच्या सत्रात वॉटरशेड यात्रा हातखंबा परिसरात दाखल झाली. तिथे सरपंच, उपसरपंच तसेच इतर मान्यवरांनी रथाचे स्वागत केले. प्र. कृषि अधिकारी रघुनाथ डवरी यांनी मार्गदर्शन केले. भूमी संसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे निर्मित मृदा व जलसंधारण याविषयी यशोगाथा दाखवण्यात आल्या. तसेच पाणलोट कामांची पाहणीही केली गेली, यावेळी सरपंच ऋतुजा गोताड, देवेंद्र सनगरे, प्रकाश गोताड, सरपंच जितेंद्र तारवे, सुनिल डांगे, विनय तारवे उपस्थित होते.

चार जणांना सन्मान
पाणलोट क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे नागरिकांना पाणलोट योद्धा तसेच धारिणीताई पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पाणलोट योद्धा म्हणून प्रकाश लक्ष्मण गोताड (झरेवाडी) व विनय तानाजी तारखे यांना वॉटरशेड ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच पाणलोट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या महिलांना धारीणीताई पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यामध्ये समीक्षा सत्यविनायक देसाई (हातखंबा) व श्रद्धा करण पाडावे यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 10/Mar/2025