रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत हापूस आंब्याच्या थेट विक्रीसाठी उत्पादकांची नोंदणी सुरू झाली आहे.
आंबा उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी आंबा महोत्सावांचे आयोजन करण्यात येते.
त्याला ग्राहकांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या हंगामाकरिता आंबा उत्पादकांना थेट विक्रीची सुविधा उपलब्ध होण्यासाठी पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आंबा उत्पादकांची स्टॉल नोंदणी सुरू आहे.
स्टॉल नोंदणीकरिता आंबा नोंदीसह ७/१२ उतारा (मागील ६ महिने कालावधीतील), आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणार्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नावे १०,००० रुपये अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहित नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इत्यादी कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.
चालू वर्षीपासून आंब्यासाठी GI स्टीकर अनिवार्य करण्यात आला आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतर्गत आंबा महोत्सवामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्या आंबा बागायतदारांनी नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, पवन बेड, कृषि व्यवसाय पणन तज्ज्ञ (७२१८३५००५४) व राजवर्धन कदम व्यवसाय पणन तज्ज्ञ (७२१८८१७७९९) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन कृषि पणन मंडळाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:12 10-03-2025














