माजी आमदार राजाराम शिंदे यांची आज ९४ वी जयंती

चिपळूण : मंदार एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व नाट्य मंदार आणि चित्र मंदारचे निर्माते माजी आमदार स्व. राजाराम शिंदे यांची ९४ वी जयंती आज ५ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने स्वर्गीय राजाराम शिंदे रंगमंदिर येथे विविध कार्यक्रम होणार असून स्व. राजाराम शिंदे यांच्या अर्धपूर्णाकृती पुतळा उभारणी कामाच्या जागेचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीतर्फे देण्यात आली आहे.

पेढांबे येथील स्वर्गीय राजाराम शिंदे यांनी सामाजिक, राजकीय, नाट्य, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे पेढांबे येथे मंदार एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिकतेची दारे खुली करून दिली. यामुळे या संस्थेतून पंचक्रोशीसह देशभरातील आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले करिअर घडवले आहे. तर आतादेखील विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत.

या व्यक्तिमत्त्वाची मंदार एज्युकेशन सोसायटीतर्फे ५ ऑक्टोबर रोजी जयंती साजरी केली जाणार आहे. सकाळी १०.३० वाजता दीपप्रज्वलन आणि राजाराम शिंदे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाईल. सकाळी १०.३५ वा. पॉलिटेक्निक आणि फार्मसीच्या विद्यार्थिनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करतील. यानंतर मान्यवरांचे स्वागत, विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच मनोगत आणि आभार प्रदर्शन होईल. दुपारी १ वाजता स्वर्गीय राजाराम शिंदे यांच्या अर्ध पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाच्या जागेचे भूमिपूजन होईल.

यावेळी आमदार शेखर निकम, रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रताप शिंदे, माजी सभापती शौकत मुकादम, माजी जि. प. बांधकाम समिती सभापती विनोद झगडे, माजी जि. प. सदस्य रमेश राणे, अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील, अमित शिरगावकर, कोळकेवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे, वाघजाई देवस्थान ट्रस्ट कोळकेवाडी अध्यक्ष जयवंत शिंदे, कोळकेवाडी सरपंच श्रीकांत निगडे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदार एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 05/Oct/2024