मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारून आमदारांचेच आंदोलन

मुंबई : ‘पेसा’ अंतर्गत विविध जिल्ह्यांतील रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करा, धनगर समाजाची आदिवासी आरक्षणातील घुसखोरी थांबवून अधिसंख्य पदे भरा आदी मागण्यांसाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी आमदारांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून प्रचंड गोंधळ घातला.

आमदारांनीच अशा पद्धतीने आंदोलन केल्यामुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पेसा’ अंतर्गत रिक्त असलेली नऊ हजार पदे भरली जातील, असे आश्वासन दिल्यानंतर या आमदारांनी आपले आंदोलन मागे घेतले.

गेल्या आठवड्यात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आदिवासी आमदार ताटकळत बसले होते. मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने ते संतप्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, किरण लहामटे (अकोले), काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (इगतपुरी), भाजप खासदार हेमंत सावरा (पालघर), बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील (बोईसर) या आमदारांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर उड्या मारून निषेध व्यक्त केला. यानंतर तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी सर्व आमदारांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यानंतर तेथेच या आमदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

पेसा अंतर्गत पदे भरण्याचे आश्वासन

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडताच मुख्यमंत्र्यांनी आदिवासी आमदारांना चर्चेसाठी पाचारण केले. परीक्षा उत्तीर्ण झालेले, पण नियुक्ती मिळालेली नाही अशी पेसा अंतर्गत असलेली ९ हजार पदे भरण्यास मान्यता दिली जाईल. न्यायालयाचा निकाल पेसा भरतीच्या विरोधात गेला तर अधिसंख्य पदे निर्माण करून आदिवासी तरुणांची भरती केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी आदिवासी आमदारांबरोबर झालेल्या बैठकीत दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेल्याची माहिती माजी खासदार राजेंद्र गावीत यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 05-10-2024