मुंबई : 12 वी बोर्डाच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे.
12 वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेणाऱ्या एका शिक्षिकेच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सदर घटना 10 मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोलींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या. मात्र, सोमवारी घरात अचानक आग लागली आणि या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला.

सदर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे बंधनकारक असताना त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी कशा नेल्या? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शिक्षण मंडळाच्या नियमानुसार, परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षित पद्धतीने शाळेतच तपासण्याचे निर्देश असतात. त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या आणि त्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तरपत्रिका जळल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 13-03-2025
