Chiplun Railway Station Ticket Window: चिपळूण रेल्वे स्थानकावरील शहराच्या बाजूची तिकीट खिडकी गणेशोत्सवापूर्वी पुन्हा सुरू होणार

कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांच्या पाठपुराव्याला यश; रेल्वे प्रशासनाचे आश्वासन

चिपळूण:

Chiplun Railway Station Ticket Window (चिपळूण रेल्वे स्थानक तिकीट खिडकी बातमी): चिपळूण रेल्वे स्थानकावरील शहराच्या बाजूकडील बंद असलेली तिकीट खिडकी आगामी गणेशोत्सवापूर्वी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी १८ ऑगस्ट रोजी रेल्वे स्थानकाला अचानक भेट देऊन केलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने हे आश्वासन दिले आहे.

प्रवाशांची गैरसोय अन् तातडीने खिडकी सुरू करण्याची मागणी

चिपळूण स्थानकाच्या शहराच्या बाजूकडील तिकीट खिडकी गेल्या काही काळापासून बंद असल्याने चिपळूण शहर तसेच गुहागर परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब शौकत मुकादम यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी ही तिकीट खिडकी तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

Chiplun Railway Station Ticket Window: रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

शौकत मुकादम यांनी माजी सरपंच रवींद्र तांबीटकर यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वेचे कमर्शियल सुपरवायझर अधिकारी खांबे यांनी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी शहराच्या बाजूकडील तिकीट खिडकी पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 19-08-2026