“माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही”, जयंत पाटलांचं विधान आणि चर्चेला उधाण

Jayant Patil News: ‘माझ्याबद्दल शंका आहे, त्यामुळे तुम्हाला हमी देणं जरा धोक्याचं आहे’, असा चिमटा काढत जयंत पाटलांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आंदोलनात एक विधान केले.

राजू शेट्टींना उद्देशून केलेल्या या विधानाचे वेगळेच राजकीय अर्थ काढले गेले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.

शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदानावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जयंत पाटलांनी भेट दिली आणि आंदोलकांशी संवाद साधला.

जयंत पाटील म्हणाले, “माझं काही खरं नाही”

“राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की, तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली… (मध्येच त्याचं नाव घेण्यात आलं) माझी गॅरंटी घेऊ नका. माझं काही खरं नाही. कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे”, असे मिश्कील विधान जयंत पाटलांनी केले.

‘राजू शेट्टींना निरोप देऊन दमलो’

त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टींना महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याच्या दिलेल्या प्रस्तावाबद्दल जयंत पाटलांनी सांगितला. हा किस्सा सांगताना जयंत पाटील म्हणाले, “यांना (राजू शेट्टी) शंभर वेळा सांगत होतो की, आघाडीकडून उभं राहा. बंटी पाटलांना विचारा. शंभर वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभं राहा. यांच्यामार्फत (सतेज पाटील) निरोप दिलेले. निरोप देऊन देऊन दमलो.”

माझा सल्ला राजू शेट्टी ऐकत नाही -पाटील

“मी म्हटलं आम्ही तुमचाच (राजू शेट्टी) प्रचार करणार आहे. तुम्ही आमच्याकडून उभं रहा. त्यावेळी काय… वेळ बदल असतो. सांगायचा मुद्दा काय तर ते आज खासदार राहिले असते, तर लोकसभेत भाषण करता आलं असते. ते झाले असते खासदार. पण, ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. बंटी पाटील साक्षीदार आहेत”, असा किस्सा जयंत पाटलांनी सांगितला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 13-03-2025