Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, पॉईंटेड उत्तर द्या; रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न, आदिती तटकरे म्हणाल्या….

मुंबई : Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार?

याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का असा सवाल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना केला? यावर आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही असं म्हटलं.

आमदार रोहित पवार यांनी अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) अर्ज भरले त्यांचं मानधन दिलं नसल्याचं म्हटलं. याशिवाय नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी ठेवावी. याशिवाय 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी करणार का याचं पॉइंटेड उत्तर द्या, असं रोहित पवार म्हणाले. तुम्हाला कृषी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या माहीत असतानाही तुम्ही त्यांना निवडणूक काळात पैसे दिले मात्र आता त्यांना देत नाही याचा अर्थ निवडणूक साठी त्याचा वापर केला का, असा सवाल रोहित पवार यांनी केला.

आदिती तटकरे यासंदर्भात उत्तर देताना म्हणाल्या…

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना इन्सेटिव्ह देण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरु आहे, असं म्हटलं. ⁠नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळतात. ⁠लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय पाहिला तर त्यात नमूद केलं आहे की 1500 पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही . त्यामुळे त्यांना वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana)देत आहे. ⁠जो आकडा कमी झाला तो विभागाने दिला नाही. ⁠तर मिडीयाने हा आकडा आणला आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडकी बहिणींना निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर किती महिलांना लाभ दिला असा सवाल केला. याशिवाय लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार की नाही हे सांगावं असा प्रश्न विचारला. यावर आदिती तटकरेंनी उत्तर दिलं.

आदिती तटकरे म्हणाल्या की ऑक्टोबर – 2024 मध्ये 2 कोटी 33 लाख 64 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम देण्यात आली. तर, फेब्रुवारी 2025 मध्ये 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ देण्यात आला, असं तटकरेंनी सांगितलं.

२१०० रुपये कधी देणार या रोहित पवार आणि वरुण सरदेसाईंच्या प्रश्नावर आदिती तटकरेंनी म्हटलं की 2100 रुपयां संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील. आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, ही दक्षता महायुती घेईल, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 13-03-2025