खेड : तालुक्यातील कशेडी येथील ग्रामस्थांना ऐन शिमगोत्सवात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चार वाड्यांना पुरेसा पाणीसाठा वितरित होत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शिमगोत्सवासाठी चाकरमानी गावी आले आहेत. चाकरमान्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थ व चाकरमान्यांनी हंडा कळशांसह ग्रामपंचायतीवर धडक देत जाब विचारला.
काही दिवसांपासून पाणीटंचाईची दाहकता वाढतच चालली आहे. कशेडी येथील सुतारवाडी, शिगवणवाडी, साळवीवाडीतील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. ग्रामपंचायतीमार्फत काही वाड्यांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असताना तीन वाड्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याबाबत ग्रामस्थांनी सातत्याने ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा ग्रामस्थांना फटका बसत आहे.
शिमगोत्सवासाठी पुणे, मुंबई येथून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आले आहेत. पाण्याअभावी चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संतापलेल्या चाकरमान्यांसह ग्रामस्थांनी हंडा कळशीसह ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.
या दरम्यान सरपंच संजय दरेकर यांच्याशी सपंर्क साधल्यानंतर त्यांनी आपल्याला अपेक्षित उत्तर न दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत ग्रामपंचायतीला धारेवर धरले. या मोर्चामध्ये संदीप सुर्वे, बाजी सुर्वे, यशवंत दरेकर, सतीश मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, कमलाकर दरेकर, प्रमोद दरेकर, प्रशांत दरेकर, समीर सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 18/Mar/2025














