पावस : उद्योगमंत्री, तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त अजय रवींद्रनाथ तेंडुलकर यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत सुनील नवले, प्रवीण शिंदे, जितेंद्र शिरसेकर आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी तालुक्यामध्ये ४६ मंडळ (सजा) असुन २०६ गावे आहेत. ४६ मंडळांना (सजांना) ४६ कृषी सहाय्यक आवश्यक असून केवळ १० कृषी सहाय्य्क ४६ मंडळे (सजा) संभाळत आहेत. तरी सर्व मंडळांना (सजांना) कृषी सहाय्यक देवून शेतक यांची अडचण दूर करावी. रत्नागिरी जिल्हयातील शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यांसाठी जिल्हा नियोजन मधून तरतूद करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
दौऱ्यासाठी हुबळी – धारवाड (कृषी संशोधन केंद्र), तुमकुर (नारळ बाजारपेठ), बेंगलोर (कृषी संशोधन केंद्र), कासरगोड (नारळ संशोधन केंद्र), मडिकेरी (वेलची संशोधन केंद्र) केरळ, मनार, त्रिशुर, कालिकत (मसाला संशोधन केंद्र) सर्व ठिकाणी नारळ, सुपारी, मसाला, पिके यावर अभ्यास करण्यासाठी संशोधन केंद्र व तसेच बाजारपेठा आहेत. तरी अभ्यासा दौऱ्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
सन २०२४-२५ आंबा व काजु पिकांचा हंगाम सुरु असून गेल्या काही दिवसात तापमानात झपाटयाने वाढ झाली आहे. जिल्हयात सातत्याने ३६.०८, ३८.०८, ३९.०८ तापमान नोंदविले जात आहे.
वाढत्या उष्णतेच्या लाटेचा फटका आंबा व काजु उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होत आहे. तापमानामुळे फळ गळ होणे आणि आंबा भाजणे यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामूळे बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांवर आलेले संकट शासन दरबारी (अधिवेनशनात) मांडून जसे कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना सरसकट पॅकेज जाहीर केले होते. त्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात नुकसान भरपाई न देता ठोस उपाय योजना म्हणून कोणताही निकष न लावता सरसकट रत्नागिरी जिल्हयातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे.
रत्नागिरी जिल्हयातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्ग काढून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 19/Mar/2025














