रत्नागिरी : पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अमली पदार्थासंबंधी गुन्हे, शरीराविषयी गुन्हे, मालमत्तेविषयी गुन्हे व इतर गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. २०२४ मध्ये जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून एकूण ७ सराईत गुन्हेगारांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. यातील ५ जणांची नावे पोलिस दलाने दिलेली नाहीत.
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हा पोलिस दल करत आहे. त्या अनुषंगाने अनेक पावले उचलली जात आहेत. एकच ठिकाणी राहून विविध गुन्हे करून आपली दहशत निर्माण करणाऱ्या काही गुन्हेगारांवर जिल्हा पोलिसांचे लक्ष होते. या गुन्हेगारांचा अतिरेक होऊ नये, यासाठी जिल्ह्यात सात सराईत गुन्हेगारांविरुद्ध जिल्हा पोलिस दलाने हद्दपारीचे प्रस्ताव पाठवले होते.
जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून ७ सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कार्यवाही केली आहे. २०२५ मध्ये आजपर्यंत २ सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक घनंजय कुलकर्णी व अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
पाचकुडे, सोलकरचा समावेश
२०२५ मध्ये तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. करबुडे, जि. रत्नागिरी) आणि सफी उल्ला समीर सोलकर (कोकणनगर रत्नागिरी) यांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही तडीपारीची कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. – धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 19/Mar/2025














