रत्नागिरी : जिल्ह्यात सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला

चिपळूण : गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर, तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांसह जखमींना आतापर्यंत १ कोटी ०९ लाख ४० हजार १६३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

वर्ष २०२२-२३ मध्ये रानगव्याने केलेल्या हल्ल्यात सतीश शांताराम जाधव (रा. फुरूस), भिकाजी राघू माडवकर (रा. माचाळ, लांजा), तसेच तुकाराम बाळू बडदे (रा. तळसर, चिपळूण) यांचा मृत्यू झाला. तर अरुण रेडीज (रा. चांदेराई, रत्नागिरी) यांचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

सह्याद्री खोऱ्यातील पातेपिलवलीतर्फ वेळंब, शेवरवाडी-नांदगाव, खानू-नवीवाडी व फुरूस (ता. दापोली), पन्हाळकाजी व ताडील (ता. दापोली), चिंचघर-खेड, तळसर-चिपळूण, चांदेराई व पाथरट (ता. रत्नागिरी), दोडवली-गुहागर, साखरपा संगमेश्वर या ठिकाणी वन्यप्राण्यांनी माणसांवर हल्ले केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 20/Mar/2025