रत्नागिरी : संत जनाबाई ही कृष्णभक्त होती. जनाबाईमुळे इतिहासाचे संकलन झाले. जनाबाईमुळे ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांच्या जन्माचा काळ कळला, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.
येथील अध्यात्म मंदिरात यांनी संत जनाबाईंच्या ६७५ व्या समाधी वर्षानिमित्त नामयाची जनी या विषयावर त्यांनी व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. संतांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले आहे. ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया घातला. संत नामदेवांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर राजस्थान, ओरिसा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत प्रवास केला आहे. नामदेवांनी चार परिक्रमा केल्या आहेत. राजस्थानमध्ये नामदेवांची ५२ मंदिरे आहेत. नामदेवांनी केलेल्या कार्यासाठी राजस्थानमध्ये नामदेव असे तेथील एका जातीला नाव दिले आहे. शीख धर्मीयांचेही नामदेव महाराजांवर निस्सीम प्रेम होते. संत जनाबाईचे संत नामदेव हे परमार्थिक गुरू होते. संत जनाबाईचे संत गाथेमध्ये ३५० अभंग आढळतात. जनाबाईंनी सख्य भक्ती केली. यादवकालीन स्त्री संतांमध्ये संत जनाबाईंचे नाव घेतले जाते.
यावेळी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, खजिनदार अमर देसाई, डॉ. शरद्चंद्र जोशी, विवेक भावे तसेच रत्नागिरीतील नागरिक उपस्थित होते. श्रीनिवास पेंडसे यांचा सत्कार हृषिकेश पटवर्धन यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद वैद्य यांनी केले, तर विवेक भावे यांनी आभार मानले.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, खजिनदार अमर देसाई, नवनिर्वाचित सदस्य डॉ. शरद्चंद्र जोशी यांचा सत्कार सौ. शीतल काळे यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 05-10-2024
