गौतमी नदीतील गाळ उपसा निधीअभावी रखडला

पावस : जिल्हा वार्षिक नियोजनातून पावस येथील गौतमी नदी गाळमुक्त होण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामपंचायत व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाळ उपसा करण्यात आला. पहिल्या टप्प्यात चांगले काम झाले होते; मात्र यावर्षीही गाळ उपसण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गौतमी नदी गाळात घेतल्यामुळे ” पाण्याचे स्रोत कमी झाले होते. नदीचे पात्र उथळ झाल्यामुळे पुराचे पाणी नदीपात्राबाहेर जात होते. त्यामुळे गाळात रुतलेल्या नदीमुळे त्याचे पात्र शोधण्याची वेळ आली होती. अशावेळी ग्रामस्थांच्या उठावानंतर २०१८च्या दरम्यान तत्कालीन सरपंच ममता गुरव यांच्या सहकार्याने व मागणीनुसार तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून गाळ उपसण्यासाठी साडेचार लाखांचा निधी प्राप्त झाला होता. त्या वेळी काही प्रमाणात गाळ उपसा केला. ज्या भागांमध्ये गाळ उपसण्यात आला त्या ठिकाणांमध्ये मे अखेरपर्यंत पाणी होते. त्यानंतर २०२३ मध्ये जिल्हा नियोजनमधून दहा लाखांचा निधी मिळाला. त्यामुळे पावस ग्रामपंचायत ते गणपती मंदिर असा गाळ काढण्यात आला. त्यामुळे नदीपात्र खोल झाले तसेच पात्राजवळ असलेल्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली त्याचबरोबर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आल्यामुळे चांगले पाणलोट क्षेत्र निर्माण झाले.

त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. त्या वेळी दुसऱ्या टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार गणपती मंदिर ते बळगे स्मशानभूमीदरम्यान गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. जेणेकरून सुमारे एक किलोमीटर लांबीच्या परिसरामध्ये पाण्याचे पारंपरिक असलेले स्रोत बळकट होऊन पाणी समस्येवर मात करणे शक्य होईल.

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या तऱ्हेने पाणी राहिल्यास नदीच्या दुतर्फा असलेल्या विहिरींची पाणी पातळी स्थिर होईल; परंतु २०२४ मध्ये या गाळ उपसण्यासाठी निधी मंजूर न झाल्यामुळे गाळ उपसण्याचे कोणतेही काम सुरू झाले नाही. २०२५ मध्ये नदीचा गाळ उपसण्यासाठी निधी उपलब्ध होईल, अशी आशा होती; परंतु ग्रामपंचायतीकडे संपर्क केला असता अद्याप त्यासाठी निधी आला नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे खऱ्या अर्थाने ४०० मीटर लांबीचा गाळ चांगल्या तऱ्हेने उपसण्यात आला. त्याचा फायदा नदीशेजारी असलेल्या बागायतदारांना व विहिरींना चांगल्या प्रकारे झाला; परंतु मागील वर्षी निधी उपलब्ध झाला नसल्याने नाराजी निर्माण झाली आहे. उर्वरित टप्प्यातील गाळ उपसण्यासाठी निधी मिळाला असता तर गौतमी नदी गाळमुक्त झाली असती; परंतु यावर्षीही निधी मिळालेला नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी केलेल्या गाळ उपशाचे काम फुकट जाण्याची शक्यता आहे. कारण पावसाळ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ येऊ शकतो –संतोष सामंत, सामाजिक कार्यकर्ते, पावस

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 20/Mar/2025