कर वसुलीसाठी राजापूर नगर परिषदेची तीव्र मोहीम

राजापूर : आर्थिक वर्ष लवकरच संपुष्टात येत असल्याने राजापूर नगर परिषदेने कर वसुली मोहीम तीव्र केली आहे. जे कर थकबाकीदार कर भरून नगर परिषदेस सहकार्य करणार नाहीत त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात येणार असून तरीही जे कर भरण्यासाठी सहकार्य करणार नाहीत अशा थकबाकीदारांची नावे शहरातील चौकामध्ये प्रसिद्ध करण्याचा इशारा राजापूर नगर परिषदेने दिला आहे.

नगर परिषदेचे आर्थिक वर्ष २०२४-२५ हे ३१ मार्च २०२५ अखेर संपुष्टात येत असल्याने राजापूर नगर परिषदेकडून कर वसुलीचे उद्दिष्ट मागील उद्दिष्टांपेक्षा कमीत कमी १० टक्केने वाढविण्यात येत आहे. शासनाकडील वसुलीची टक्केवारी वाढल्यास अनुदान देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. नगर परिषदेने वसुलीसाठी पथके नेमलेली असून थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करणे आणि वसुली करणे यासारखी कारवाई नगर परिषदेने सुरू केलेली आहे. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत एकूण १९ नळ कनेक्शन बंद करण्यात आलेली आहेत. तरी सर्व मिळकतधारक त्यांचे भोगवटाधारक, नळ कनेक्शनधारक व गाळेधारक यांनी कराच्या रक्कमा नगर परिषद कार्यालयात लवकरात लवकर भरून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कर भरणा न केल्यास नळ कनेक्शन बंद करणे तसेच जप्ती वसुली सारखी कठोर कारवाई करून कराचा भरणा नगर परिषदेकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच थकबाकीधारक यांची नावे शहरातील चौकामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून याबाबत मानहानीचे प्रसंग उद्भवल्यास नगर परिषद जबाबदार राहणार नाही याची सर्व कर थकबाकीधारकांनी नोंद घ्यावी, अशी कारवाई टाळण्यासाठी कर भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही नगर परिषदकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:15 PM 21/Mar/2025