किर्तनकार भगवान कोकरे यांचे उपोषण अखेर स्थगित

रत्नागिरी : गेले ६ दिवस किर्तनकार भगवान कोकरे महाराज गोमातेच्या संरक्षणासाठी उपोषण करत होते. आज जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत ह्यांनी सरकारच्या वतीने त्यांची लोटे, खेड येथे भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले की “गोमातेचे संरक्षण हे महायुती सरकारचे ब्रीद असून, गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचे ऐतिहासिक काम तत्कालीन मुख्यमंत्री, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. तसेच गोहत्या करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करत मकोका अंतर्गत कारवाई करण्याची सरकारची ठाम भूमिका आहे. यावेळी कोकरे महाराजांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. तसेच, कोकरे महाराजांच्या चांगल्या कामाला आणखी कशी मदत करता येईल याबाबतही विचार करण्यात येईल. राज्य सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.

गोमातेचे रक्षण हे केवळ एक कर्तव्य नसून, ती आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. या कार्यासाठी महायुती सरकार सदैव तत्पर असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 22-03-2025