चिपळूण : चिपळूण येथील रावतळे येथे म्हाडाने १९८५ साली १०५ व १०६ नंबरच्या हिश्यांवर नाममात्र किमतीला जागा ताब्यात घेतली होती. मात्र, गेल्या चार दशकांत त्या जागेवर कोणताही प्रकल्प उभा राहिला नाही. स्थानिकांसोबत अनेक बैठका आणि चर्चा झाल्या. ६० टक्के जागा म्हाडाकडे तर ४० टक्के जागा स्थानिकांना देण्याचा निर्णयही झाला. तरीही, ४० टक्के जागेचा लाभ अद्याप नागरिकांना मिळालेला नाही. चिपळूण शहर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनने वेढलेले आहे.
अशा परिस्थितीत म्हाडा नवीन इमारती बांधू शकत नाही. त्यामुळे या जागांचा पुनर्विचार व्हावा. शेतकऱ्यांना नवीन दरानुसार योग्य मोबदला द्यावा किंवा त्या जागा स्थानिकांना परत कराव्यात, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी विधानसभेत केली.
शहरातील रावतळे येथे म्हाडाने १९८५ साली घेतलेल्या जागेवर अद्यापपर्यंत कोणताही प्रकल्प झालेला नाही. संबंधित जागा मालकांसमवेत आजवर अनेक बैठका झाल्या. तरीही येथील प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे आता म्हाडाने संबंधित स्थानिकांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला द्यावा, अथवा त्या जमिनी त्यांना परत कराव्यात, अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अनेक उणिवा आ. निकम यांनी अधोरेखीत केल्या.
रत्नागिरी जिल्ह्यात मेडीकल कॉलेज सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय त्याच्याशी संलग्न झाले आहे. परिणामी, कामथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. कामथे रुग्णालयाला सिव्हिल रुग्णालयाचा दर्जा द्यावा आणि औषधांचा आवश्यक साठा त्वरीत उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणीही आ. निकम यांनी केली.
त्याचबरोबर संगमेश्वर येथील ट्रॉमा केअर सेंटर आणि देवरुखमधील ग्रामीण रुग्णालयातील उणिवा भरून काढण्याची आवश्यकता असल्याचेही अधोरेखित केले. वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भातही कोकणसाठी वेगळा विचार करण्याची मागणी केली.
नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना लोकसंख्येच्या निकषांमुळे कोकण वंचित राहतो. शिवाय, नर्सिंग कॉलेजसाठी ४५ लाख रुपयांची प्रोसेसिंग फी भरावी लागते, जी कोकणसारख्या भागासाठी अन्यायकारक आहे. त्यामध्ये बद्दल कोकणाच्यादृष्टीने अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या मेडीकल कॉलेजमधून किमान १०% जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावी अशी मागणी आ. निकम यांनी सभागृहात केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 24/Mar/2025














