गुहागर : कोतळूक येथे कार नदीपात्रात कोसळून भीषण अपघात

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी – आबलोली मार्गावर कोतळूक येथे भीषण अपघात झाला. क्रेटा कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नदीपात्रात कोसळून घटना घडली. या अपघातामध्ये वेळंब येथील अभय मेडिकलचे मालक अभय अरविंद ओक (वय ५१) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अभय ओक कोतळूक येथून गुहागरकडे कामानिमित्त निघाले होते, त्यावेळी वाटेत हा दुर्दैवी अपघात घडला. घरातून कामानिमित्त निघाले तर परतलेच नाहीत.

अभय ओक यांचे कोतळूक येथे मेडिकल दुकान, जनरल स्टोअर आणि चिरेखाणीचा व्यवसाय आहे. परिसरातील सुप्रसिद्ध व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. शनिवारी, २२ मार्चला ते घरातून कामानिमित्त गुहागर येथे निघाले होते. मात्र, पुन्हा घरी परतलेच नाहीत. त्यांच्या जाण्याने ओक कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

गुहागर तालुक्यातील कोतळूक मांडवकरवाडी येथे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने क्रेटा वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन रस्त्याशेजारी असलेल्या नदीपात्रात कोसळले. या अपघातामध्ये अभय ओक यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. अपघाताची माहिती मिळताच तातडीने त्यांना अपघातस्थळावरुन शृंगारतळी येथील डॉक्टर सचिन ओक यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांना अभय ओक यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत असलेले अभय ओक काही काळ उपचारांना थोडा प्रतिसाद दिला होता. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथे नेण्यात आले. पण डेरवण येथे पोहोचून उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अभय ओक यांचा मृत्यू झाल्याचं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

अभय ओक यांचे आबलोली येथे मेडिकल दुकान आहे. मूळचे वेळंब येथील असलेल्या अभय ओक यांची मोठी बागायत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 24/Mar/2025